श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्री हायस्कूल विषयी

श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ स्त्रियांचे हायस्कूल ही पुण्यात मध्यवस्तीत भरणारी, प्रौढ महिलांना शिक्षण देणारी शाळा. २० व्या शतकात स्त्रियांच्या शिक्षणासाठी झटणाऱ्या शिक्षणव्रती श्रीमती रमाबाई रानडे यांनी शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी २ ऑक्टोबर १९०९ रोजी पुणे सेवासदन ह्या संस्थेची स्थापना केली. आणि तेव्हापासून प्रौढ स्त्री शिक्षणाचे हे कार्य निरलसपणे चालू आहे.

२०२२ साली ह्या शाळेला सरकारी मान्यता मिळून ५० वर्षे पूर्ण झाली. पण प्रौढ स्त्रियांना साक्षर करण्याचे, त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम करण्याचे हे कार्य अगदी सुरुवातीच्या काळापासून म्हणजे सेवासदन संस्थेच्या स्थापने पासून ते आजपर्यंत चालू आहे. आणि चालू राहील. सेवासदन संस्थेची स्थापना आदरणीय रमाबाई रानडे यांनी मुळात स्त्रियांना शिक्षित व स्वयंपूर्ण करण्यासाठी केली. आजही त्याच आदर्शांवर रमाबाई रानडे प्रौढ प्रशालेचे कामकाज सुरू आहे.

वय वर्षे १४ पासून पुढील वयाच्या स्त्रिया ज्यांचे शिक्षणच झालेले नाही किंवा अर्धवट सुटले आहे अश्या स्त्रियांना इथे प्रवेश दिला जातो. त्यांची लेखन – वाचनातील तसेच गणनामधील एकंदरीत प्रगती पाहून त्यांना ६वी, ८वी ९वी किंवा १०वी मध्ये प्रवेश दिला जातो. अगदी मुळापासून तयारी करून घ्यायची असेल तर प्रौढ प्राथमिक च्या वर्गात जिथे १ली ते ४ थी चा अभ्यास होतो, तिथे पाठवले जाते.

शालेय शिक्षण विभागाने नेमून दिलेला नियमित अभ्यासक्रम इथे शिकवला जातो. कोणत्याही साधारण वयोगटातील विद्यार्थी विद्यार्थिनी ज्या नियमांनुसार व ज्या अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा देऊन इयत्ता १०वी ची परीक्षा उत्तीर्ण होतात त्याच नियमांनुसार व अभ्यासक्रमानुसार येथील विद्यार्थिनी बोर्डाची १०वी ची परीक्षा देतात. सर्व नियम, अभ्यासक्रम सांभाळून सर्व इयत्तांची परीक्षा देणे ह्या विद्यार्थीनींसाठी एक आव्हानच असते. अभ्यासाचा सुटलेला सराव, वाढलेल्या वयामुळे काहीवेळा स्मरण, लेखन क्षमता, वाचन क्षमता यावर येणाऱ्या मर्यादा, स्वतःची नोकरी – घरकाम , कौटुंबिक जबाबदाऱ्या या सर्व गोष्टींना तोंड देत त्यांना शिक्षण घ्यायचे असते. शिक्षकांसाठी सुद्धा अध्यापनाचे कार्य हे एक आव्हानच असते कारण ह्या विद्यार्थिनींची मानसिकता समजून घेणे, त्यांच्या अडचणी सोडवणे, त्यांना धीर देणे, प्रोत्साहन देणे आणि मग त्यांना हा अभ्यासक्रम रुचेल, पचेल अश्या पद्धतीने समजावून सांगणे हे कौशल्याचे काम. ह्यासाठी शिक्षक जेवढा आपल्या विषयात तरबेज हवा तेवढाच तो सहृदय पण हवा.

ह्या शाळेतील शिक्षक ह्या विद्यार्थिनींसाठी सर्वतोपरीने झटत असतात. वय वर्ष १४ पासून पुढे वेगवेगळ्या वयोगटातल्या स्त्रिया एका वर्गात असतात, त्यांची शैक्षणिक प्रगती वेगवेगळी असते, पण काहीतरी वेगळं करण्याची, पुन्हा शिकण्याची त्यांची कारणं वेगवेगळी असली तरी उर्मी एकच असते. हेच ह्या शाळेचे वैशिष्ट्य. बदलत्या काळानुरूप इथे स्त्रियांना संगणक शिकवला जातो. त्यांना वाचनासाठी प्रेरित केले जाते. विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साहित्यिक, कवी, विचारवंत यांची व्याख्याने त्यांच्यासाठी आयोजित केली जातात. आजपर्यंत अनेक विद्यार्थिनी येथे शिकून पुढे वेगवेगळे कोर्स करून स्वयंपूर्ण झाल्या आहेत. नर्सिंग पार्लर, केटरिंग अश्या छोट्या मोठ्या व्यवसायांबरोबरच काही जणी बँकिंग क्षेत्रात आहेत. समाजसेवेसारख्या कामातही ह्या विद्यार्थिनी सहभागी होतात. अभिमानाने सांगावी अशी गोष्ट म्हणजे एका विद्यार्थिनीची नायब तहसीलदार ह्या पदावर निवड झाली आहे.

ह्या शाळेत सर्व आर्थिक-सामाजिक स्तरातील विद्यार्थिनींना प्रवेश असतो. पण बहुसंख्य विद्यार्थिनी ह्या आर्थिक-सामाजिक दृष्ट्या वंचित गटातील असतात. अर्थात चांगल्या आर्थिक- सामाजिक स्थिती मधील स्त्री कोणत्याही कारणाने शिक्षणापासून वंचित असेल तर ती वंचित गटातीलच म्हणावी लागेल. अश्या शिक्षणापासून वंचित राहिलेल्या सर्व स्त्रियांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या आर्थिक-सामाजिक उन्नती साठी पुणे सेवासदन संस्थेची श्रीमती रमाबाई रानडे प्रौढ प्रशाला नेहमीच कटिबद्ध आहे

Scroll to Top