पुणे सेवासदन संस्थेविषयी
रमाबाई रानडे (१८६२-१९२४) या भारतातील आणि भारताबाहेरील आधुनिक महिला चळवळीच्या प्रणेत्या मानल्या जातात. त्यांचा जन्म २५ जानेवारी १८६२ रोजी कुर्लेकर कुटुंबात झाला. १८७३ मध्ये वयाच्या ११ व्या वर्षी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्याशी झालेल्या विवाहामुळे त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. न्यायमूर्ती महादेव रानडे हे स्वतः एक समाज सुधारक होते आणि त्यांनी रमाबाईंना त्यांच्या लग्नानंतर शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहीत केले. त्यांनी रमाबाईंना इतर भाषा शिकण्यासाठी देखील पाठिंबा दिला.
रमाबाईंनी मुंबईत ‘ हिंदू लेडीज सोशल क्लब ‘ सुरू केला. १९०१ मध्ये पतीच्या दुःखद निधनानंतर रमाबाई पुण्यात आल्या आणि त्यानंतर ०२ ऑक्टोंबर १९०९ रोजी पिडीत स्त्रियांच्या पुनर्वसनासाठी व त्यांना शिक्षित करण्यासाठी त्यांनी सेवासदनची स्थापना केली. रमाबाईंना स्वर्गीय गोपाळकृष्ण देवधर यांनी पाठिंबा दिला होता, जे सेवासदनचे पहिले मानद सचिव होते. या अथक प्रयत्नांमुळे हजारो स्त्रिया साक्षर, स्वावलंबी आणि आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकल्या.
रमाबाईंना माहित होते की स्त्रियांना शिक्षित केल्याने त्यांची सामाजिक स्थिती सुधारेल. त्यांनी शिक्षणाबरोबरच त्यांना नर्सिंग सारखे व्यवसाय करण्यात प्रोत्साहीत केले. तरुण मुली आणि विधवांना नर्सिंग हा व्यवसाय म्हणून स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करताना रमाबाईंना सनातनी सामाजिक वातावरणाशी लढा द्यावा लागला.
सामाजिक वातावरण फारसे आश्वासक नसले तरी रमाबाईंच्या सततच्या प्रयत्नामुळे सेवासदनची झपाट्याने वाढ झाली. रमाबाईंनी त्यांच्या आत्मचरित्रात स्त्रियांच्या समान दर्जा आणि शिक्षणाच्या अधिकाराला विरोध करणाऱ्या समाजात बदल घडवून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचे वर्णन केले आहे.
सुरुवातीच्या काळात सेवासदन स्त्रियांसाठी काम करणारी संस्था होती ज्यात विधवा व परित्यक्ता स्त्रियाही असत. बदलत्या काळानुसार सेवासदन संस्थेने देखील सामाजिक गरजा लक्षात घेऊन त्यानुसार संस्थेचा विस्तार केला आहे. आज मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, प्रौढ प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळा, पूर्व प्राथमिक व प्राथमिक मराठी माध्यमाच्या शाळा सुरू केल्या आहेत. अध्यापिका विद्यालय, मुलींचे वसतिगृह, मतिमंद मुलांसाठी दिलासा कार्यशाळा, इंग्रजी माध्यमांची मुला-मुलींची प्री प्रायमरी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा, असा संस्थेच्या विविध शाखांचा विस्तार आहे.
